पिंपरी (Pclive7.com):- विकासाचं मॉडेल म्हणून समोर आलेलं पिंपरी चिंचवड शहर आज झालेल्या दमदार पावसात अक्षरश: बुडून गेलं. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आल्याचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. आजच्या पावसात पिंपरीगाव, थेरगाव, पिंपरी ग्रेडसेपरेटर, चिंचवड, विकसीत भाग समजले जाणारे पिंपळे सौदागर तसेच शहरातील सखल भागातील रस्ते पावसाच्या पाण्यामुळे तुंबल्याचे चित्र होते. प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या नियोजनशुन्य कारभारामुळे पिंपरी चिंचवडची ‘तुंबानगरी’ झाली.
स्मार्ट सिटीत समावेश झालेलं पिंपरी चिंचवड सर्वच बाबतीत सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते. मात्र आज झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे दर्शन झाले. गेल्या दोन महिन्यापासून शहरात नालेसफाईचे काम मोठ्या जोमात सुरू होते. नाले १०० टक्के साफ केल्याचा दावा देखील पालिका प्रशासनाने केला होता. मात्र आज हे सर्व दावे खोटे ठरले आहेत. महापालिकेसमोर असलेल्या ग्रेडसेपरेटरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यात अनेक गाड्या बंद पडल्यामुळे लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. थेरगाव ‘ग’ प्रभाग कार्यालयासमोर तर कंबरे एवढे पाणी साचले होते. याठिकाणच्या पाण्यात एक स्कूल बस बंद पडली होती. त्या बसमध्ये अडकलेल्या मुलांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले. पिंपरीगावात तपोवन मंदीर रोडवर अक्षरश: कंबरे एवढे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करत त्यातून दुचाकी, चारचाकी बाहेर काढावी लागली. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, तसेच विविध कॉलनी, सोसायट्यांमध्ये पाणी साचले होते. शहरातील अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला होता. तर अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणा देखील बंद होती. अनेक भागात पावसाळी गटारे तुंबली होती. काही ठिकाणी या गटारातील पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्याने ते थेट रस्त्यावर ओसंडून वाहत होते. तसेच अनेक ठिकाणी पाणी घरात शिरले होते. पाणी साचण्याचा असंख्य तक्रारी पालिकेस प्राप्त झाल्या होत्या.
महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारावर वर्षभर आरोप झालेत. सत्ताधार्यांना नियोजनबध्द काम करता येत नसल्याची ओरड विरोधकांकडून होत होती. आजच्या पावसात पिंपरी चिंचवडमधील सर्वच भाग तुंबल्याने प्रशासनाबरोबर सत्ताधारी देखील अपयशी ठरले आहेत.





















Join Our Whatsapp Group