

पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची महती सांगणारे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन् भीमनगर मोहल्ला’ हे विद्रोही तसेच अंतर्मुख करणारे मराठी नाटक नव्या दमाने रंगमंचावर परतले आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या पुनरागमन प्रयोगाला प्रेक्षकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दर्दी प्रेक्षकांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ची दाद देतानाच नाटकाच्या टीमचे भरभरून कौतुकही केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शेतकरी, कष्टकरी, शोषितांचे प्रेरणास्थान होते. शिवाजी महाराजांनी कधीही जाती-पातीवरून भेदभाव केला नाही. तरीही त्यांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडली जाते. महारांजाच्या मूळ विचारांना बगल दिली जाते. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून तसेच जातीय गटांकडून महाराजांचे नाव स्वतःच्या सोयीसाठी वापरले जाते, यावर नाटकातून परखड भाष्य केले जाते. बोली भाषेतील खुसखुशीत संवादांच्या माध्यमातून हसत-खेळत नेमके मर्मावर बोट ठेवले जाते.

दमदार आणि सूचक संवाद, जोशपूर्ण अभिनय, लोककलेच्या ढंगात हलक्याफुलक्या विनोदातून गंभीर आशय मांडतानाच समानता, न्याय व बंधुतेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करते. लोककला व आधुनिक रंगभूमीच्या संगमातून हे नाटक केवळ इतिहास सांगत नाही. तर वर्तमानाला भिडते. ते फक्त रंगमंचावर घडत नाही. प्रेक्षकांच्या मनात नवा प्रकाश पेरतं. प्रेक्षकांना आरसा दाखवण्याचेही काम करते. नाटकाच्या माध्यमातून फक्त मनोरंजन होत नाही तर सामाजिक जागृती, इतिहासाचा पुनर्विचार आणि समानतेचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण काम होते. सर्व बाजू मांडून अखेरीस त्यातून काय घ्यायचे, याचा निर्णय प्रेक्षकांवर सोडला जातो.

मुंबईतील यशवंत नाट्य संकुलात (माटुंगा) २० मे २०१२ रोजी पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून सुरू झालेला या नाटकाचा प्रवास ७०० हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केल्यानंतरही सुरूच आहे. मूळचे शेतकरी असलेल्या जालना परिसरातील कलाकारांनी मिळून हे नाटक बसवले आहे. विविध अडचणींवर मात करून त्यांनी आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

मध्यंतरी थांबलेले हे नाटक आता अद्वैत थिएटर्सचे युवा निर्माते राहूल भंडारे यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा रंगभूमीवर आले आहे. प्रसिध्द लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहीलेले आणि लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा कैलाश वाघमारे आणि संभाजी तांगडे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

संभाजी तांगडे, कैलाश वाघमारे, मीनाक्षी राठोड, चिन्मयी स्वामी, राजकुमार तांगडे, प्रविणकुमार डाळिंबकर, डॉ. अश्विनी भालेकर, अशोक देवकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, राजेंद्र तांगडे, संघराज वाघमारे, किशोर उडाण, रागिणी वाघमारे या कलाकारांनी प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवण्याची उत्तम कामगिरी करत आहेत.
– बाळासाहेब जवळकर (ज्येष्ठ पत्रकार)
