
पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण क्षेत्रात गेल्या काही तासांपासून संततदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढत आहे. पवना धरण सध्याच्या १०० टक्के भरले असून आज (दि.२८) सकाळी १०.३० वाजता २८८० क्युसेक्सने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

पवना धरण पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या नागरिकांना आवाहन केले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की सद्यस्थितीमध्ये पवना धरण १०० टक्के भरलेले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात १४०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसास सुरुवात झाली असून आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून एकूण विसर्ग २८८० क्युसेक्सने करण्यात येणार आहे.

पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. तरी सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.




