पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, वाकड आणि संलग्न परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन सेवांची उपलब्धता अत्यंत अपुरी असल्याचे वास्तव समोर आले आहे.

या संपूर्ण पट्ट्यात गेल्या काही वर्षांत बहुमजली निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, सीएनजी पेट्रोल पंप, एलपीजी गोडाऊन, मल्टिप्लेक्स तसेच हॉटेल व्यवसाय यांची झपाट्याने वाढ झाली आहे. उच्च जोखमीच्या अशा घटकांच्या प्रचंड घनतेनुसार अग्निशमन व्यवस्थेचा विस्तार मात्र थक्क करणाऱ्या पद्धतीने झालेला नाही. सदर समस्येची गांभीर्याने दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांना लेखी पत्रव्यवहार करून या पट्ट्यात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची तातडीने स्थापना करण्याची मागणी केली आहे.

सदर परिसरात आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठा विलंब होत असल्याची नागरिकांची गंभीर तक्रार आहे. यामध्ये बीआरटी मार्ग, मेट्रो मार्ग, रेल्वे लाईन आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडी यांचा मोठा अडथळा निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. परिणामी आग, स्फोट, अपघात, पूरस्थिती, जंगल/गवत आग अशा प्रसंगांत नागरिकांच्या जीवित व वित्तसुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून दापोडी ते वाकड या विस्तीर्ण पट्ट्यासाठी तातडीच्या प्राथमिकतेने मनपा अग्निशमन केंद्राची स्थापना करावी, आवश्यक कर्मचारी, अग्निशमन वाहने व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नाना काटे यांच्याकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. वाढत्या नागरीकरणाला साजेशा सुरक्षा यंत्रणा उभारणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचेही नाना काटे यांनी स्पष्ट केले आहे.





















Join Our Whatsapp Group