सांगवी (Pclive7.com):- ऑनलाईन ट्रॅफिक दंड भरण्याच्या नावाखाली आलेल्या बनावट मेसेजमुळे पिंपळे निलख येथील एका नागरिकाची १ लाख ६८ हजार ४४२ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर “Compulsory Traffic Fine Reminder: Non-Compliance Will trigger license cancellation & further legal consequences. Settle immediately!” असा मजकूर असलेला मेसेज आला होता. त्यात एक लिंक देण्यात आली होती. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ट्रॅफिक पोलिसांचा ५०० रुपयांचा दंड थकबाकी असल्याचे दर्शविण्यात आले.
दंड भरण्यासाठी फिर्यादीने मोबाईलवरील ‘प्रोसीड’ बटणावर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून ५०० रुपयांऐवजी तब्बल १ लाख ६८ हजार ४४२ रुपये कट झाल्याचे आढळले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. सांगवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून संबंधित लिंक व मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच कोणतेही ऑनलाईन व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group