पुणे (Pclive7.com):- प्रवास सुरक्षित होण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसही सतत प्रबोधन करत असतात. परंतु, तरीही काही वाहनचालक सर्रास वाहतुकीचे नियमभंग करताना आढळून येतात. अशाच तब्बल १८६२ बेशिस्त वाहनचालकांचे गाडी चालवण्याचे परवाने पुणे वाहतूक पोलिसांनी जप्त केले आहेत. तर, २७९ वाहनचालकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन रोखण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
बेशिस्त वाहनचालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. वाहतूक पोलिसांनी यापूर्वीच नियमभंग करणाऱ्या १० लाख १८ हजार वाहनचालकांकडून २२.५४ कोटी रुपयांचा दंडही वसूल केला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय बेशीस्त वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यासही वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत वाहतूक शाखेने तब्बल १८६२ जणांचे परवाने जप्त करून ते रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे केली आहे. यामध्ये रॅश ड्रायव्हींग, मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
यासोबतच पासपोर्ट व्हेरिफिकेशन आलेल्या अर्जांपैकी २७९ जणांनी वाहतुकीचे नियमभंग केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन रोखून धरण्यात आले आहेत. या अर्जदारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आणखी काही गुन्हे आहेत का? याची पडताळणी करुन हे अर्ज पुढे पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांचे अर्जही फेटाळले जाऊ शकतात, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group