पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात गुरुवारी भरदिवसा एका टोळक्याने तरुणाला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुंडांच्या वाढत्या दहशतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील राजरतन डेंटल क्लिनिकसमोर ही घटना घडली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी लाथा-बुक्क्यांसह जोरदार मारहाण करतानाच जवळच पडलेले दगड उचलून त्याच्यावर प्रहार केले. काही काळ हा ‘फ्री-स्टाईल’ राडा सुरू होता.

घटनेच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक घाबरून गेले होते. मात्र, एका सजग नागरिकाने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group