आळंदी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता माउलींची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल १७ दिवसांच्या भक्तिमय पायी प्रवासानंतर २४ जुलै रोजी पालखी पंढरपूर नगरीत दाखल होणार असून, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा भक्तिभावात साजरा केला जाणार आहे.

पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी ही माहिती दिली. यंदाच्या वारीत ४ गोल रिंगण आणि ३ उभी रिंगणे पार पडणार असून, वारकऱ्यांसाठी हा आध्यात्मिक उत्सव भक्तीचा परमोच्च क्षण ठरणार आहे.

पुणे, सासवड, जेजुरीमार्गे पंढरीकडे वाटचाल..
८ जुलैला आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ९ आणि १० जुलै रोजी पालखीचा पुण्यात मुक्काम असेल. त्यानंतर ११ आणि १२ जुलैला सासवड, १३ जुलैला जेजुरी आणि १४ जुलैला वाल्हे येथे मुक्काम होणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ होईल.
१६ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडणार असून, त्या दिवशी तरडगाव येथे मुक्काम असेल. पुढे १७ जुलैला फलटण, १८ जुलैला बरड आणि १९ जुलैला नातेपुते येथे पालखीचा मुक्काम होणार आहे.

रिंगण सोहळ्यांनी रंगणार भक्तिमय वातावरण..
२० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण पार पडेल आणि माळशिरस येथे मुक्काम असेल. २१ जुलैला खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन पालखी वेळापूर येथे विसावेल.
२२ जुलैला ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण पार पडणार असून, टप्पा येथे ऐतिहासिक ‘बंधू भेट’ सोहळा रंगेल. त्यानंतर पालखी भंडीशेगाव येथे पोहोचेल.
२३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे अशा दोन्ही रिंगणांचा भक्तिमय सोहळा पार पडणार असून, त्या दिवशी पालखी वाखरी येथे मुक्कामी असेल.

२४ जुलैला पंढरपुरात पालखींचा भव्य प्रवेश..
आषाढ दशमीच्या शुभमुहूर्तावर २४ जुलै रोजी सर्व संतांच्या पालख्यांसह संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडणार आहे.
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात यंदाची वारी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे दर्शन घडवणार आहे.




















Join Our Whatsapp Group