पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडीतील पाचपीर चौक परिसरात पाईपलाईनमध्ये पाय अडकून गंभीर परिस्थितीत अडकलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेची पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने तब्बल दोन तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर सुखरूप सुटका केली. जवानांच्या प्रसंगावधान, संयम आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी ठरली.

स्मिता भागवत कासारे असे सुटका करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, दुपारच्या सुमारास त्यांचा पाय पाणीपुरवठा व्हॉल्व्हसाठी असलेल्या सुमारे २०० मिमी रुंदीच्या आणि पाच फूट खोल पीव्हीसी पाईपमध्ये गुडघ्यापर्यंत अडकला होता. पाय आतमध्ये वळल्यामुळे त्यांना हालचाल करणे अशक्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम पाईपच्या सभोवतालची जमीन अत्यंत काळजीपूर्वक खोदण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरातील गॅस पाईपलाईन व विद्युत केबल्सना कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. बचाव मोहिमेत बॅटरी ऑपरेटेड ग्राइंडर कटर, हायड्रॉलिक कटर तसेच पेट्रोल इंजिन ऑपरेटेड कटरसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला.

दरम्यान, महिला अग्निशामक जवानांनी स्मिता कासारे यांच्याशी सतत संवाद साधून त्यांना मानसिक आधार दिला. त्यांना वेळोवेळी पाणी पाजण्यात आले, जेणेकरून त्या घाबरून किंवा अशक्त होऊन बेशुद्ध पडणार नाहीत. दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी गर्दी नियंत्रणात ठेवली, तर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी जेसीबी उपलब्ध करून देत बचाव कार्यात महत्त्वाची मदत केली.

सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा पाय सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेत महिलेला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. वृद्ध महिलेची सुखरूप सुटका होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.




















Join Our Whatsapp Group