पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काटकसर करा असं म्हणत परदेश वाऱ्या टाळण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवडच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता दिली आहे. केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींचं आवाहनाला छेद दिला आहे. आता महापौर रवि लांडगे हे पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे
संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat संस्थेचे वर्ल्ड अर्बन फोरम हे तेरावे अधिवेशन आहे. यामध्ये शहरी विकास विषयक जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाकु अझरबैजान येथे पार पडणाऱ्या या परिषदेला रवि लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले उपस्थित राहणार आहेत. 17 मे ते 22 मे दरम्यान हे जागतिक अधिवेशन पार पडणार असून पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने या दौऱ्यासाठी निधी ही मंजूर केला आहे.
या दौऱ्यावर 8 लाख 80 हजार 281 रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी 10 मे ला देशहितासाठी जनतेला आवाहन केलं. काटकसर करण्यावर भर द्या, असं आवर्जून सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मे ला भाजपचं सरकार असलेल्या महाराष्ट्र शासनाने महापौरांच्या परदेश दौऱ्याला मान्यता देत पंतप्रधानांच्या आवाहनाला छेद दिला आहे. आता पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार का? शहराचे प्रथम नागरिक असलेले रवि लांडगे याबाबत काय निर्णय घेतात? याकडे पिंपरी चिंचवड शहरवासीयांचं लक्ष लागून आहे.

मोदींच्या आवाहनानंतर महापौर परदेश दौऱ्यावर ठाम, पण….
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलंय, त्यानंतर ही महापौर रवि लांडगे परदेश दौऱ्यावर ठाम आहेत. मी फिरायला नव्हे तर विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या जागतिक अधिवेशनासाठी अझरबैजानला निघालोय, असं म्हणत लांडगेंनी परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलंय. केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये ही भाजपची सत्ता असताना महापौरांनी ही भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिलेत, हा आदेश अभ्यास दौऱ्यांच्या अनुषंगाने असेल तर मी सुद्धा माझा हा परदेश दौरा रद्द करेन. असं महापौर लांडगेंनी म्हटलंय. लांडगे हे 17 मे ला अझरबैजानला दौऱ्यावर जाणार आहेत, तत्पूर्वी ते हा दौरा रद्द करतात की दौऱ्यावर ठाम राहतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.