
पिंपरी (Pclive7.com):- “तुमचे MNGL गॅस कनेक्शन बंद होणार असून थकीत बिल तात्काळ भरा” असा बनावट संदेश पाठवून एका नागरिकाची तब्बल १ लाख ५८ हजार ८०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि.६ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ७ मे २०२६ दरम्यान नेवाळे वस्ती, चिखली परिसरात घडली. फिर्यादीच्या मोबाईलवर MNGL GAS कनेक्शन कट होणार असल्याचा मेसेज आला होता. तसेच थकीत गॅस बिल तात्काळ भरा असे सांगत आरोपीने “BIN MNGL BILL UPDATE” नावाची फाईल पाठवली होती.

फिर्यादीने त्या मेसेजवर विश्वास ठेवून संबंधित फाईल ओपन केली. त्यानंतर अवघे १२ रुपये थकीत गॅस बिल भरण्यासाठी ॲपमध्ये स्वतःच्या क्रेडिट कार्डची माहिती भरली. मात्र त्यानंतर आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या साउथ इंडियन बँकेच्या वनकार्ड क्रेडिट कार्डमधून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पैसे ट्रान्सफर केले.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक, APK फाईल किंवा बिल अपडेट संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच बँक व कार्डची माहिती कोणत्याही ॲपमध्ये भरताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group