पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे शहर अभियंता पद गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असल्याने शहरातील विकासकामे आणि प्रशासकीय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

रमेश वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयुक्तांनी पदभार स्वीकारून दोन महिने पूर्ण झाले तरी अद्याप कायमस्वरूपी शहर अभियंत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर हे पद रिक्त राहणे गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिकेत अनुभवी, शैक्षणिक पात्रता असलेले आणि कार्यक्षम स्थानिक अभियंते उपलब्ध असताना नियुक्ती लांबणीवर पडत असल्याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही राजकीय हस्तक्षेपामुळे हे पद रिक्त ठेवल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, आवश्यक प्रशासकीय अनुभव आणि शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अभियंत्याची शहर अभियंता पदावर तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी रमेश वाघेरे यांनी केली आहे. तसेच शहरातील रखडलेली विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




















Join Our Whatsapp Group