दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश; युवकांसाठी रेशीम उद्योगाला चालना देण्यावर भर
मावळ (Pclive7.com):- राज्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. विधानभवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रोजगार हमी योजना समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी यवतमाळ जिल्हा दौऱ्यात समोर आलेल्या समस्या, अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने आणि प्रलंबित कामांची सद्यस्थिती यावर गंभीर चर्चा झाली.
बैठकीत रोजगार हमी विभागांतर्गत मंजूर असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना अनेक कामे अपूर्ण असल्याचे तसेच काही कामे रद्द झाल्याचे निदर्शनास आले. कामांमध्ये सातत्याने होत असलेल्या विलंबाबाबत समितीने प्रशासनाला धारेवर धरत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच प्रत्येक कामाचा स्पष्ट आणि सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत रेशीम लागवड उद्योगाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. युवकांना प्राधान्याने अनुदान मिळावे, यासाठी स्वतंत्र योजना तयार करून ती प्रभावीपणे राबविण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली. रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या बैठकीस समिती सदस्य आमदार राजेश वानखडे, आमदार हिकमत उढान, आमदार संजय दरेकर, आमदार किशोर दराडे आणि आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते. तसेच रोजगार हमी योजना, महसूल व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो), तहसीलदार, बीडीओ आणि संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group