पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकाम प्रकल्पांना होणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करून उपलब्ध पाणी नागरिकांच्या गरजांसाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

ऐश्वर्या तरस यांनी याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात सध्या पाण्याची उपलब्धता कमी होत असून अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. किवळे-रावेत प्रभाग क्र.१६ सह विविध परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पुरवठा होणे तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.

अशा परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील निवासी, व्यावसायिक व औद्योगिक बांधकाम प्रकल्पांना महापालिकेमार्फत अथवा इतर माध्यमांतून पुरविण्यात येणारा पाणीपुरवठा तात्पुरता स्थगित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी पुनर्वापरित (Recycled) पाणी, टँकर किंवा इतर पर्यायी स्रोतांचा वापर करावा, अशा सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी प्रशासनाकडे केली आहे. शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या मागणीची चर्चा सुरू असून महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group