पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. चाकण येथील रुबी बेकरी व खंडोबा माळ परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजासह दोघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह एक स्कॉर्पिओ गाडी, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत राजेंद्र बिरंगळ आणि कुशल उद्धव पाठक अशी आहेत. १८ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल वर्षे आणि विजय दौंडकर यांना संशयित हालचाली आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ४१ लाख ९८ हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे, जिलाणी मोमीन, पोलीस हवालदार जावेद बागसिराज, ज्ञानेश्वर मुळे, किशोर परदेशी, निखिल शेटे, विजय दौंडकर, पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे, निखिल वर्षे, कपिलेश इगवे यांच्या पथकाने असुन तांत्रिक विश्लेषणसाठी पोलीस शिपाई सुभाष गुरव, पोलीस हवालदार प्रकाश ननावरे यांनी मदत केली आहे.




















Join Our Whatsapp Group