विषारी दारूकांडाचे पडसाद विधिमंडळात उमटणार
पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती . या भीषण दुर्घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी या संवेदनशील प्रकरणावर लक्षवेधी सूचना (लक्षवेधी क्रमांक १) विधानसभेत दाखल केली आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या २२ जूनपासून मुंबई येथे सुरु होत आहे. या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून फुगेवाडी विषारी दारूकांडाकडे सरकारचे लक्ष वेधून घेत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि या जीवघेण्या अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकण्याची आक्रमक मागणी आमदार जगताप करणार आहेत. गेल्या २८ मे ते १ जून २०२६ या कालावधीत फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी गावठी दारू पिऊन १९ जणांचा वेदनादायी अंत झाला होता. काळा गूळ आणि उसाच्या मळीपासून तयार केल्या जाणाऱ्या गावठी दारूची नशा व तीव्रता वाढवण्यासाठी माफियांकडून धोकादायक नवसागर, युरिया, ऑक्सिटोसिन रसायन, आणि अत्यंत प्राणघातक मिथेनॉल यांसारख्या रसायनांची बेकायदेशीरपणे भेसळ करून हे मृत्यूचे तांडव घडवून आणले गेले.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले , दारूकांड झाल्यानंतरही तसेच शहरात पोलिसांची कारवाई सुरू असताना दारू माफियांनी दुर्गम भागात आपल्या हातभट्ट्या हलवून शहरात विषारी दारू पुरवठा सुरूच ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दारू माफियांनी फुगेवाडी, दापोडी आणि हडपसरमध्ये मृत्यूचे जे तांडव घडवले, ते पाहून मन सुन्न झाले आहे. रसायनांची जीवघेणी भेसळ करून निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही. या पीडित कुटुंबांचे अश्रू वाया जाऊ देणार नाही. अधिवेशनात या गंभीर विषयावर पहिली ‘लक्षवेधी’ मांडून गुन्हेगारांना शिक्षा आणि पीडितांचे पुनर्वसन हीच माझी प्राथमिकता आहे.” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

या प्रश्नांवर आवाज उठविणार!
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडवणे. आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीविषयक तक्रारींसाठी ‘फास्टट्रॅक लेबर कोर्ट’ सुरू करणे या मागणीसह औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटना रोखण्यासाठी सर्व कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ बंधनकारक करणे. शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावे. पिंपरी-चिंचवड मनपाचा चुकांनी भरलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करावा आणि मनपा प्रशासनातील ४,७७६ रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी मंजुरी द्यावी. याशिवाय, प्राधिकरणाच्या आरक्षित जागांवर दीर्घकाळापासून राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालकीचे सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड मिळावे. ‘महाज्योती’ संस्थेमार्फत वंचित विद्यार्थ्यांची तांत्रिक कारणांमुळे अडकलेली सुमारे १२६ कोटी रुपयांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने मंजूर करावी, औंध जिल्हा रुग्णालयातील बंद असलेली एमआरआय सुविधा सुरू करावी आणि महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागण्यांवर आमदार जगताप सभागृहात आवाज उठवणार आहेत.
आगामी काळात “अवैध दारूचा साठा, वाहतूक आणि विक्रीची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्यात तातडीने माहितीची देवाणघेवाण करून संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी विशेष पथकाची सक्षम यंत्रणा उभारून मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन दिले पाहिजे. ही मागणी लक्षवेधीद्वारे सभागृहासमोर ठेवली आहे.– आमदार शंकर जगताप (चिंचवड विधानसभा)




















Join Our Whatsapp Group