मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर भटकंतीसाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून सुमारे ३५० फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

केतन विशाल आगरवाल (रा. लोढा सोसायटी, गहुंजे, क्रिकेट स्टेडियमसमोर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

या दुर्घटनेमुळे लोहगड परिसरात शोककळा पसरली असून, पावसाळी वातावरणात किल्ले आणि पर्यटनस्थळांवर भटकंती करताना पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















Join Our Whatsapp Group