श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेज नगर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेज नगर यांच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र देताना प्रा. विजय नवले यांनी “यश प्राप्तीसाठी शिस्त, सातत्य आणि योग्य दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे” असे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी, “मी भविष्यात काय होणार यापेक्षा मी समाजाला काय देणार, हा विचार अधिक महत्त्वाचा आहे,” असे सांगत करिअर निवडताना स्वतःची आवड आणि क्षमता यांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मावळचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “शैक्षणिक यश ही केवळ गुणांची नव्हे, तर जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमांची पावती असते,” असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष AICT चे अध्यक्ष प्रा. राजेश सपरा यांनी विद्यार्थ्यांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाबतच्या शंकांचे निरसन करताना, “AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम होईल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. उलट या तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि प्रभावी वापर करून स्वतःला अधिक सक्षम बनवावे,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले होते. कार्यक्रमात लेखक व समुपदेशक राजेंद्र घावटे, प्रा. कल्याण वाणी, प्रा. हरिनारायण शेळके, राजू गुणवंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सारिका रिकामे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण बहिरवाडे यांनी केले, तर राजेंद्र घावटे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षमा काळे, शोभा नलगे, स्नेहा गुणवंत, नीलिमा भंगाळे, तराळे काका, मेघराज बागी, रोहन नंदनवाड, ज्ञानदेव नारखेडे आणि गीता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.




















Join Our Whatsapp Group