आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंशिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्यासाठी आळंदी देवस्थानच्या वतीने विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि स्वच्छता यासंदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मागील महिन्यात घडलेल्या दानपेटी चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाची प्रतिमा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ५७ कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत हे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे तसेच इतर विश्वस्त उपस्थित होते.
व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कल्लूरकर आणि डॉ. सुधीर हसमनीस यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्या तसेच व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. भाविकांशी संवाद साधताना नम्रता, संयम आणि सेवाभाव जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक भाविकामध्ये माऊलींचे रूप पाहून त्यांची आदरपूर्वक सेवा करण्याचा संदेश देण्यात आला. शिबिराच्या समारोपावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी भाविकांशी सन्मानाने वागण्याची, सेवाभाव जपण्याची आणि देवस्थानाची प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याची माऊलींच्या सेवकाची शपथ घेतली. “भाविकांची सेवा हीच माऊलींची सेवा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमाचे भाविक आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group