पुणे (Pclive7.com):- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची जन्मठेप म्हणजेच फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.
‘हे कृत्य क्रूरतेची सीमा पार करणारे’ – न्यायालय
शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आरोपीच्या कृत्याचा निषेध केला. न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, “आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कुठलाच पर्याय सोडला नाही. पीडित मुलगी अवघी साडेतीन वर्षांची होती आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनातून सिद्ध झाले आहे. आरोपीने हत्येनंतरही अत्याचार सुरूच ठेवला, जे क्रूरतेची परिसीमा गाठणारे आहे. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली असून, हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ (दुर्मिळातील दुर्मिळ) या श्रेणीत येते. त्यामुळे आरोपी केवळ आणि केवळ फाशीच्या शिक्षेस पात्र आहे.”
कोर्टात रचला खोट्या कहाणीचा बनाव..
न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो (POCSO) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. मागील सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपीला विचारले होते की, “तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी?” तेव्हा आरोपीने मौन बाळगले होते. मात्र, आज त्याने न्यायालयात पुन्हा एकदा खोटी कहाणी सांगत बचावाचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीशांनी त्याला कडक शब्दांत फटकारत त्याचा दावा फेटाळून लावला.
सरकार पक्षाचा जोरदार युक्तिवाद..
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडताना आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. “आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय अमानुष आहे. त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही,” हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरला.
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: १५ दिवसांत १२४० पानांचे आरोपपत्र
महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत अवघ्या १५ दिवसांच्या आत १,२०० पानांचे अत्यंत भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. १६ व्या दिवशी या प्रकरणात आरोपपत्र निश्चित झाले आणि अवघ्या दोन महिन्यांत पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला. या जलद गती न्यायनिवाड्याचे संपूर्ण राज्यातून स्वागत होत आहे.























Join Our Whatsapp Group