पिंपरी (Pclive7.com):- लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवाल याची हत्या झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून खून केल्याचा आरोप असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

या घटनेत निष्पाप बळी ठरलेल्या केतन अग्रवाल याला न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील हजारो रहिवाशांनी एकत्र येत भव्य कॅण्डल मार्च काढला. हातात मेणबत्त्या आणि न्यायाच्या घोषणा देत नागरिकांनी केतनच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

कॅण्डल मार्च दरम्यान नागरिकांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच अग्रवाल कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकजूट दाखवली पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

या वेळी उपस्थित नागरिकांनी, “केतनला न्याय मिळालाच पाहिजे” आणि “दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे” अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, न्यायाच्या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायप्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group