पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ‘अप्पू घरा’चा लवकरच कायापालट करण्यावर आमचा भर असणार आहे. काळाची गरज ओळखून या ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अप्पू घराच्या आधुनिकीकरणाचा मानस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात माहिती देताना सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, “अप्पू घर हे सर्वसामान्यांसाठी पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. सध्याच्या महागड्या अम्युझमेंट पार्क्सच्या तुलनेत अप्पू घराचे तिकीट दर अत्यंत कमी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी विशेष बदल झाले नव्हते. आता तेथील राईड्स आणि सुखसोयींचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे.”

आधुनिकीकरण करताना सर्वसामान्यांचा विचार
अप्पू घराच्या विकासकामांबाबत बोलताना बारणे यांनी स्पष्ट केले की, जरी सुविधा आधुनिक केल्या तरी त्याचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशाच प्रकारे ठेवले जातील. कामगारांच्या शहरात सामान्य नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी हे दर मर्यादित ठेवण्यावर महापालिकेचा भर असेल.

अप्पू घरासाठी २०३१ पर्यंत संबंधित कंत्राटदारावर करार करण्यात आला आहे. यामध्ये वॉटर पार्क आणि इतर नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. सध्याच्या कामांचा आढावा घेताना बारणे म्हणाले की, “या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून ऑक्टोबरपर्यंतची कामे वेगाने पूर्ण केली जातील. कामाचा दर्जा उत्तम असावा आणि पर्यटकांना एक दर्जेदार अनुभव मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अप्पू घराला पुनर्जीवित करून त्याला पुन्हा एकदा शहराचे ‘दिमाखदार’ आकर्षण म्हणून विकसित करण्याचा संकल्प सभापतींनी यावेळी व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group