पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील टी.ई.टी. आणि विविध भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार व पेपरफुटी प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य सरकारकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुनील गव्हाणे यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत टी.ई.टी., पोलीस भरती, शिक्षक भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्य सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. केवळ चौकशीच्या घोषणा न करता दोषींना कठोर शिक्षा देऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खात्री करावी, असेही संघटनेने म्हटले आहे.

प्रमुख मागण्या :
टी.ई.टी. आणि पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी.
पेपरफुटीशी संबंधित संपूर्ण साखळीचा शोध घेऊन दोषींना न्यायालयात उभे करावे.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवावी.
भरती व स्पर्धा परीक्षा वेळेत, नियमित आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्यात याव्यात.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधात सरकारने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबावे.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.




















Join Our Whatsapp Group