बारामती (Pclive7.com):- ‘पोलिओमुक्त भारत’ ही आपली सामूहिक जबाबदारी आहे; यादृष्टीने राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे; पोलिओवर मात करण्याचा प्रभावी मार्ग लसीकरण आहे, त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने पुढे येऊन आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे बालकांना लसीचे दोन थेंब पाजून जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पोलिओमुक्त महाराष्ट्र राज्यासह भारत देशाकरिता आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, या लसीमुळे बालकाचे आयुष्य सुरक्षित आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे. निरोगी बालक, निरोगी कुटुंब आणि निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी हातभार लावूया, चला एकत्र येऊया आणि पोलिओमुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट करूया, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.




















Join Our Whatsapp Group