पिंपरी (Pclive7.com):- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत आणि परदेशातून महागड्या भेटवस्तू पाठवल्याचे भासवून एका ३० वर्षीय महिलेची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सांगवी परिसरात राहतात. १५ जून २०२६ पासून आरोपीने इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून मैत्री केली. त्यानंतर लग्नासाठी मागणी घालत विश्वास संपादन केला. आरोपीने परदेशातून ज्वेलरी, डायमंड, कपडे, फुटवेअर आणि आयफोनसह महागड्या वस्तूंचे पार्सल पाठविल्याचे सांगितले.

यानंतर स्वतःला डीएचएल कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या दुसऱ्या आरोपीने फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. पार्सल कस्टम ड्युटीमध्ये अडकल्याचे सांगून सुरुवातीला ५ लाख ३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर पार्सल सोडविण्यासाठी आणखी ५ लाख ८० रुपयांची मागणी करण्यात आली.

फिर्यादी महिलेने आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रक्कम भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपींसह परदेशी मोबाईल क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार न करण्याचे तसेच लग्न, भेटवस्तू किंवा परदेशी पार्सलच्या नावाखाली पैसे मागितल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




















Join Our Whatsapp Group