
देहू (Pclive7.com):- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पोलीस प्रशासन तसेच देहू संस्थानकडून वारकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पालखी प्रस्थानाच्या वेळी पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.

संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिराबाहेर पडताच पावसाने पुन्हा हजेरी लावली. तरीही हजारो वारकरी पावसाची पर्वा न करता टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरावटीत आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात पालखीसोबत मार्गक्रमण करत राहिले. संपूर्ण देहू नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज रात्री पालखीचा इनामदार वाड्यात विसावा होणार असून, उद्या सकाळी शासकीय पूजेनंतर पालखी रथ पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. पावसाचे संकट असतानाही पालखी सोहळा सुरळीत पार पडल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेक भाविकांनी विठ्ठल-रखुमाई आणि पांडुरंगाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.





















Join Our Whatsapp Group