पिंपरी (Pclive7.com):- सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडत असून, त्याचा फटका पुणे–मुंबई मार्गावरील वाहतुकीला बसला आहे. दरड कोसळल्यामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने पुणे–मुंबई आणि मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, दरड हटविण्याचे आणि रस्ता सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना व अद्ययावत माहितीची खातरजमा करूनच प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group