पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात अल्पकालीन पाऊस झाला तरी अनेक प्रमुख रस्ते, चौक, महामार्ग आणि निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिकांना दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी नैसर्गिक जलप्रवाह, नाले-ओढे आणि पाणी मुरण्याच्या व्यवस्थेचे संवर्धन करून पावसाळी पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

भाऊसाहेब भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पाणी तुंबण्याची समस्या केवळ अतिवृष्टीमुळे निर्माण होत नसून नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमणे, वाढते काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉकचा अतिवापर आणि अनियंत्रित शहरीकरण यामुळे ती अधिक गंभीर बनत आहे. पूर्वी रस्त्यांच्या कडेला असलेले मातीचे चर, नैसर्गिक नाले, ओढे आणि खुल्या जागा पावसाचे पाणी वाहून नेण्यास व जमिनीत मुरविण्यास मदत करत होत्या. मात्र या नैसर्गिक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील अनेक भागांमध्ये मोकळी माती शिल्लक नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता कमी झाली आहे. रस्ते, पदपथ, सोसायट्यांचे आवार तसेच सार्वजनिक जागांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण झाल्यामुळे जलनिस्सारण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच अनेक नैसर्गिक नाले, ओढे, तलाव आणि जलमार्गांचे मूळ स्वरूप बदलले असून काही ठिकाणी त्यांची रुंदी कमी झाली आहे तर काही ठिकाणी प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे भविष्यातील शाश्वत विकासासाठी या नैसर्गिक जलस्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने शहरातील सर्व नैसर्गिक जलप्रवाह, नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याचे मार्ग यांचे वैज्ञानिक मॅपिंग करावे, तसेच नवीन विकासकामे, गृहप्रकल्प आणि सार्वजनिक प्रकल्पांना मंजुरी देताना नैसर्गिक जलप्रवाह अबाधित राहतील याची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय रेन वॉटर रिचार्ज झोन, जैविक जलनिस्सारण व्यवस्था (बायो-स्वेल्स), खुल्या मातीच्या जागांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक जलव्यवस्थापन उपाययोजनांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

शहराचा विकास केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि इमारती उभारण्यात नसून पर्यावरणीय संतुलन, जलव्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यामध्येही असल्याचे सांगत प्रशासनाने याबाबत तातडीने व्यापक आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे.




















Join Our Whatsapp Group