पिंपरी (Pclive7.com):- पावसामुळे घरकुल परिसरात निर्माण झालेल्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उद्देशून एक भावनिक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत त्यांनी हातात अजितदादांचा फोटो घेऊन घरकुलमधील नागरिकांच्या व्यथा मांडत प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओमध्ये मारुती जाधव म्हणतात, “अजितदादा, तुम्ही इथे असता तर प्रशासन अवघ्या २४ तासांत खडबडून जागे झाले असते. आज घरकुलमधील नागरिकांना वारंवार पाणी तुंबणे, ड्रेनेजचे पाणी घरात शिरणे आणि विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आम्ही जणू पोरके झाल्यासारखे वाटत आहोत. आमच्या वेदना ऐकणारे आणि कायमस्वरूपी न्याय देणारे कोणी तरी हवे आहे.”

घरकुल परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणे, जलनिस्सारण व्यवस्थेचा बोजवारा उडणे आणि नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याचे जाधव यांनी नमूद केले. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“हा व्हिडिओ कोणावरही टीका करण्यासाठी नाही. घरकुलमधील हजारो नागरिकांच्या वेदना, भावना आणि अपेक्षा अजितदादांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे,” असेही मारुती जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या भावनिक व्हिडिओची घरकुल परिसरासह शहरात मोठी चर्चा सुरू असून, नागरिकांनीही घरकुलमधील पाणी तुंबण्याच्या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.




















Join Our Whatsapp Group