पिंपरी (Pclive7.com) : पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोड परिसरात महावितरणच्या डीपी बॉक्सचा करंट लागून एका गाईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.७ जुलै) दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश मंदिराजवळ, किर्ती हॉस्पिटल शेजारी ही घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, महावितरण कंपनीच्या डीपी बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रवाह असल्याने गाईला करंटचा जबरदस्त धक्का बसला. करंट लागल्यानंतर गाय काही फूट दूर फेकली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, यापूर्वीही पिंपरी गावातील वैभवनगर येथे १२ मे २०२५ रोजी अशाच प्रकारची घटना घडून गाईचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यासाठी अद्याप पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या नव्या घटनेबाबत युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मुक्या जनावराचा बळी गेला आहे. या घटनेस जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वैभवनगर आणि किर्ती हॉस्पिटल परिसरातील दोन्ही प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार,” असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.





















Join Our Whatsapp Group