पिंपरी (Pclive7.com):- तडीपार आदेशाचे उल्लंघन करून खुलेआम सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगून फिरणाऱ्या एका गुन्हेगाराला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम गोरक्ष साकोरे (वय २४, रा. विठ्ठल रेसिडेन्सी फेज-१, आदर्श नगर, किवळे, ता. हवेली, जि. पुणे) या तडीपार गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

रावेत पोलिसांनी ही कारवाई दि.१० जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिंदेवस्ती ते गणेशनगर जाणाऱ्या ८० फूट डांबरी रस्त्यालगत, व्हिक्टरी क्रिकेट अकॅडमीसमोरील मोकळ्या जागेत केली आहे. रावेत पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस कर्मचारी प्रदीप कामाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर १० नोव्हेंबर २०२५ रोजी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. त्याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो विनापरवानगी परिसरात आढळून आला. यावेळी त्याच्याकडून सुमारे ८५० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group