
दोषी बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आप युवा आघाडीची मागणी; रविराज काळे यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा अधिक जुन्या वृक्षांची तोड करताना कागदपत्रांमध्ये वृक्षांची संख्या आणि वय कमी दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला आहे. या प्रकरणातील कथित गैरव्यवहाराचा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा निषेध करण्यासाठी आप पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दिली.

महापालिकेजवळील संबंधित बांधकाम प्रकल्पासाठी सुखवानी असोसिएट्स या बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाचा मूळ अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे. उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आणि राजेश वसावे या अधिकाऱ्यांनी अहवालात फेरफार करून वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि जनतेची दिशाभूल केल्याचा दावा पक्षाने केला आहे. या कथित प्रकारामुळे बिल्डरला दीड कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा फायदा झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी..
या प्रकरणात संबंधित बांधकाम व्यावसायिकासह कथितरीत्या अहवालात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आप युवक आघाडीने केली आहे. दिशाभूल करून मिळवलेली बांधकाम परवानगी रद्द करावी, तसेच नियमानुसार १,०१८ वृक्षांच्या लागवडीसाठी प्रतिवृक्ष १५ हजार रुपये याप्रमाणे सुमारे १ कोटी ५२ लाख रुपयांचा दंड वसूल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांना तातडीने निलंबित करावे आणि संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर सखोल चौकशी करावी, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.

कारवाई न झाल्याने आंदोलनाचा निर्णय..
या कथित गैरव्यवहाराची माहिती अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप रविराज काळे यांनी केला. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दि.२२ गुरुवारी दुपारी ३ वाजता वृक्षतोड झालेल्या ठिकाणापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आऊटगेटपर्यंत ‘वृक्ष अंत्ययात्रा’ काढण्यात येणार आहे. ‘वृक्षतोड थांबवा, निसर्ग वाचवा!’ या घोषणेसह आयोजित आंदोलनात शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
– रविराज काळे, प्रदेशाध्यक्ष, आम आदमी पार्टी व महाराष्ट्र राज्य युवक आघाडी.
Tags: Raviraj Kale


















Join Our Whatsapp Group