पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य देण्यासह कर्जवसुलीला लगाम घालणे, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांबद्दल भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. या निर्णयांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रावर गेल्या अनेक दशकांत न अनुभवलेल्या भीषण दुष्काळाचे सावट असल्याचे नमूद करत काटे म्हणाले की, राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या परिस्थितीत पाणी, पीक आणि चारा नियोजनासोबतच शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जवसुलीच्या तगाद्यातून शेतकऱ्यांना दिलासा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याचे काटे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा पिकांचे नियोजन तसेच शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याच्या निर्णयामुळे पशुधनाचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या सवलती, पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील राज्याचा सहभाग अशा विविध योजनांमधून शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याचेही काटे यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही भाऊबीजेची भेट
राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्याच्या निर्णयाचेही काटे यांनी कौतुक केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणाऱ्या वार्षिक सन्मान निधीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार मिळत असल्याचे त्यांनी म्हटले.

कर्नाटक सरकारच्या मदतीशी तुलना
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत ही कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या अडीच हजार रुपयांच्या मदतीपेक्षा दुप्पट असल्याचा दावा काटे यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तत्परतेने पावले उचलली असून, शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राजकारण बाजूला ठेवा’
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असून, तिचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा गंभीर परिस्थितीत विरोधकांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे आणि महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला साथ द्यावी, असे आवाहन शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याबरोबरच भविष्यात दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



















Join Our Whatsapp Group