
मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर प्रतीक्षा; व्हिडीओमुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) शवविच्छेदन विभागात दारू पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्याने रुग्णालयाच्या कामकाजावर आणि संबंधित विभागातील शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शवविच्छेदनासारख्या अतिसंवेदनशील विभागात टेबलवर दारूची बाटली, भरलेले पेग, खाण्याचे पदार्थ आणि जेवणाची ताटे दिसत असल्याचा दावा व्हिडीओच्या आधारे केला जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणाऱ्या ठिकाणी असा प्रकार घडल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी रात्रभर प्रतीक्षा..
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला रात्रभर थांबूनही दाखला मिळाला नव्हता. दाखला मिळण्यास विलंब का होत आहे, हे पाहण्यासाठी संबंधित व्यक्ती विभागात गेल्यानंतर या पार्टीचा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेचा नेमका घटनाक्रम आणि संबंधित बाबींची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा..
व्हिडीओमध्ये चेहरा दिसणारी व्यक्ती कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी वैभव म्हस्के असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. व्हिडीओतील दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित व्यक्तींची ओळख, व्हिडीओची सत्यता आणि मद्यसेवनाबाबतचे आरोप यांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधितांची बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही.

प्रशासन चौकशी करणार का?
शवविच्छेदन विभाग हा रुग्णालयातील अत्यंत संवेदनशील विभाग असून, तेथील कामकाजात शिस्त आणि नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कथित प्रकाराची रुग्णालय प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन गंभीर दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हिडीओची सत्यता तपासून संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार का? मृत्यूचे दाखले देण्यास झालेल्या विलंबाची चौकशी होणार का? तसेच शवविच्छेदन विभागातील कामकाजाची तपासणी केली जाणार का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या भूमिकेतूनच स्पष्ट होतील.


















Join Our Whatsapp Group