मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे मावळ तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते.

आमदार सुनील शेळके यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या लेखी तक्रारीत श्री. सुनील रघुनाथ गुजर (रा. पिंपळोली, ता. मावळ, जि. पुणे) यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित व्यक्तीने स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सांगून महाराष्ट्र शासनाचे खोटे अथवा बोगस ओळखपत्र वापरल्याचा तसेच नागरिकांना नाहक त्रास देऊन धमकावून पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आमदार सुनील शेळके हे आपल्या मतदारसंघातील शासकीय कामकाजासाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, संबंधित व्यक्तीने त्यांच्या वैयक्तिक, संवेदनशील व्यावसायिक तसेच खासगी माहितीबाबत इतर व्यक्तींच्या नावाने अर्ज करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन आढळल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आमदारांच्या कार्यालयाची रेकी केल्याचा आरोप..
संबंधित व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून आमदारांच्या कार्यालयात तसेच नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून येऊन त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची माहिती यापूर्वी मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आमदारांची माहिती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने रामदास काकडे यांच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्ती हे सर्व करत असल्याचे समजत असल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दोन्ही मोबाईलची चौकशी करण्याची मागणी..
आमदार सुनील शेळके यांनी संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करावी, त्याच्या दोन्ही मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासावेत आणि या प्रकरणात तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

आमदार सुनील शेळके हे मावळ तालुक्यातील विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियमित सहभागी होत असतात. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि मतदारसंघात सतत फिरणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप समोर आल्याने त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असली, तरी या प्रकरणातील आरोपांची सत्यता, पाळत ठेवण्यामागील नेमका उद्देश आणि यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


















Join Our Whatsapp Group