
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १६ ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश जारी केले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचेही निर्देश दिले आहेत.

१५ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात अत्यावश्यक सेवा बजावत असताना डॉ. म्हस्के हे मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेत रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे अहवाल सादर केला होता. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असताना अशा प्रकारचे वर्तन करणे हे गंभीर गैरवर्तन मानले जात आहे.

शासकीय आचारसंहिता तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. डॉ. म्हस्के यांच्याविरुद्ध १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करून विभागीय चौकशीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निलंबनाच्या कालावधीत डॉ. म्हस्के यांना पिंपरी येथील महापालिका मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, या काळात अन्य कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

वायसीएमसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक रुग्णालयात कर्तव्यावर असताना घडलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय सेवांमधील शिस्त आणि जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील विभागीय चौकशीतून पुढे काय निष्पन्न होते आणि संबंधित अधिकाऱ्यावर कोणती अंतिम कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

















Join Our Whatsapp Group