विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा चालवल्याचा आरोप; रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश आल्याचा डॉ. बाबा कांबळे यांचा दावा
पुणे (Pclive7.com):- पुणे शहरात आवश्यक परवान्याविना बाईक टॅक्सी सेवा चालवल्याप्रकरणी रॅपिडो (रोपेन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिवहन विभागाने केलेल्या कारवाईचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने स्वागत केले असून, रिक्षाचालकांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळाल्याची प्रतिक्रिया पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिली आहे.

परवाना नाकारल्यानंतरही सेवा सुरू ठेवल्याचा आरोप..
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) यापूर्वीच रॅपिडोचा परवाना अर्ज फेटाळला होता. तरीही कंपनीकडून बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने केला आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात पंचायतीने सातत्याने पाठपुरावा केला होता.

१५ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, आवश्यक परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यात बाईक टॅक्सी सेवा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्देशांचे पालन न करता सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिवहन विभागाने कारवाई केली.

व्हाइट प्लेटच्या दुचाकीवरून प्रवासी वाहतूक..
१६ ऑक्टोबर रोजी विश्रांतवाडी परिसरात परिवहन विभागाने कारवाई करत रॅपिडोशी संबंधित एका दुचाकीवर दंडात्मक कारवाई करून ती जप्त केली. खासगी वापरासाठी नोंदणीकृत असलेल्या व्हाइट प्लेटच्या दुचाकीवरून विनापरवाना प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कंपनीविरुद्ध मोटार वाहन कायदा, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर..
या कारवाईचे स्वागत करताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “रॅपिडोसारख्या कंपन्या शासनाच्या नियमांचे आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करता मनमानी पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आमचा आक्षेप आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. रिक्षाचालकांकडे अधिकृत परवाना, बॅच आणि परमिट असते. असे असताना कोणतीही आवश्यक कायदेशीर परवानगी नसताना खासगी दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणे चुकीचे आहे.”

“महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाने केलेली ही कारवाई म्हणजे रिक्षाचालकांच्या संघर्षाला मिळालेला दिलासा आहे. या लढ्यात साथ देणाऱ्या सर्व घटकांचे आणि कारवाई करणाऱ्या प्रशासनाचे आम्ही अभिनंदन करतो,” असेही कांबळे यांनी सांगितले.

अनधिकृत प्रवासी वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा..
रॅपिडोवरील या कारवाईमुळे पुणे शहरातील अनधिकृत प्रवासी वाहतुकीला आळा बसेल आणि नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने व्यक्त केली आहे. आता प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करते आणि बाईक टॅक्सी सेवांबाबत नियमांची अंमलबजावणी कशी होते, याकडे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group