राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरीमध्ये उमेदवारी दिलेले माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतू, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना काँग्रेसचा पाठिंबा नाही. बुधवारी (९ ऑक्टोबर) अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकार परिषद घेऊन चिंचवड व भोसरीतील उमेदवारांना राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहिर केले. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड व भोसरीमध्ये परस्पर ‘पुरस्कृत’ उमेदवार जाहिर केले आहेत. हे आम्हाला कदापि मान्य नाही. याबाबत अद्यापही प्रदेश काँग्रेसकडून शहर काँग्रेसला काही आदेश नाहीत, असे पत्रक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
सचिन साठे यांनी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आघाडी धर्माचे पालन करावे. चिंचवड व भोसरीमध्ये परस्पर उमेदवार पुरस्कृत करण्याअगोदर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक होते. तसे न करता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुरस्कृत उमेदवारांची घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीबाबत सुरु असणाऱ्या शहरातील घडामोडींविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी जातीयवादी पक्षांविरूद्ध लढण्याची आहे. चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा बहुसंख्य मतदार आहे. शहर पदाधिकाऱ्यांनी आघाडीचा धर्म पाळावा असा काँग्रेसच्या वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे. परंतू, ‘पुरस्कृत’ उमेदवाराला मदत करणे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य नाही. शहरात कोणताही उमेदवार पुरस्कृत करण्याअगोदर राष्ट्रवादीने काँग्रेसशी संवाद साधायला हवा होता. स्थानिक पातळीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी व वरिष्ठ पातळीवर वरिष्ठांशी चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार पुरस्कृत केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चिंचवड व भोसरीमध्ये पुरस्कृत उमेदवाराचे काम करणार नाहीत, असेही सचिन साठे यांनी पत्रकात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group