पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
किवळे रावेत प्रभागातून बाळासाहेब ओव्हाळ हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना अर्थात शिवसेनेला गेली. त्यानंतर बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत थेट महायुतीच्या उमेदवारालाच आव्हान दिले आहे. ओव्हाळ यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ओव्हाळ यांच्यामुळे नक्कीच महायुतीचे उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेत बाळासाहेब ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे बाळासाहेब ओव्हाळ यांना पक्षातून निलंबित केल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका सीमा सावळे यांनी देखील महायुतीच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी बाळासाहेब ओव्हाळ यांच्याप्रमाणेच सीमा सावळे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करणार का? याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group