पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील अत्यंत वर्दळीचा असलेला गोविंद-यशदा चौक हा ‘सिग्नल-फ्री’ झाला आहे. यामुळे इथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न मिटला आहे. या सब-वेसाठी १० कोटी रुपयांचा निधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मंजूर करून घेतला होता. तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम जलदगतीने पूर्ण झाले असल्याचे मत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट परिसर म्हणून पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागाकडे पाहिले जाते. अत्यंत झपाट्याने या परिसराचा विकास झाला आहे. इथले बहुसंख्य रहिवासी हिंजवडी आयटी परिसरात कामाला आहेत. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. म्हणूनच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर सिग्नल-फ्री करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याची माहीती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, गोविंद-यशदा चौक हा सिग्नल-फ्री झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला, जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना या चौकातून ये-जा करणे अत्यंत सोपे होणार आहे. बीआरटी बसने प्रवास करणे देखील नागरिकांना सोईचे होणार आहे. लवकरच सुदर्शन चौकातील ग्रेडसेपरेटरचे काम देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रभागातील होणारी वाहतूक कोंडी कायमची संपणार असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group