विनोद नढे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद निविदा प्रक्रिया, भ्रष्ट कारभार आणि शासन निर्णयांच्या उल्लंघनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निविदा प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विनोद नढे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रदीप जांभळे यांनी विविध विभागांची जबाबदारी सांभाळताना घेतलेले काही निर्णय महापालिकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचवणारे ठरले असून ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर झाल्याचा संशय आहे.
तक्रारीतील प्रमुख मुद्द्यांनुसार, अनेक निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. निविदा अटींमध्ये फेरफार करून विशिष्ट ठेकेदारांना फायदा करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत जादा दराच्या निविदांना मंजुरी देताना तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, विविध विभागांतील कंत्राटी कर्मचारी भरती, साहित्य खरेदी आणि देखभाल कामांमध्ये कंत्राटदारांशी संगनमत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही निकृष्ट दर्जाच्या किंवा तक्रारी असलेल्या कामांची देयके विनाचौकशी मंजूर करण्यासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याचे नढे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर, प्रदीप जांभळे यांनी गेल्या दोन वर्षांत मंजूर केलेल्या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे तपासणी करावी, तसेच मोठ्या निविदांचे फॉरेन्सिक ऑडिट स्वतंत्र संस्थेमार्फत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्पुरते जबाबदारीतून दूर करावे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, संशयास्पद प्रकल्पांची प्रलंबित देयके चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखून धरण्याची मागणीही करण्यात आली आहे. महानगरपालिकेची प्रतिमा जपण्यासाठी आणि जनतेच्या पैशाचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group