
आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडूनही प्रशासनाचा ‘कानाडोळा’; विनोद नढे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी परिसरातील अनधिकृत ‘जीजस इज लॉर्ड’ चर्चवर तातडीने निष्कासनाची कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. याठिकाणी धर्मांतराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे कठोर पावले उचलण्याची मागणी करत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडणी प्रशासनाकडून याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप नढे यांनी केला आहे.

नगरसेवक विनोद नढे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत ‘जीजस इज लॉर्ड’ चर्चच्या बांधकामाबाबत आणि तिथल्या संशयास्पद हालचालींबाबत स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच विषयाचे गांभीर्य ओळखून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न गांडल्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाकडून सदर अनधिकृत इमारतीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही खेदाची बाब आहे. प्रशासनाच्या या ढिलाईमुळे संबंधित घटकांचे मनोधैर्य वाढले असून, गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धर्मातरणाचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेतः
१. काळेवाडीतील सदर अनधिकृत ‘जीजस इज लॉर्ड’ चर्चच्या बांधकामाची त्वरित तपासणी करून ते निष्कासित (Demolish) करण्यात यावे.
२. या ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या धर्मातर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कडक कारवाई करावी.
३. विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रशासनाने इतके दिवस दुर्लक्ष का कैले, याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील २४ तासांत प्रत्यक्ष कारवाई सुरु करावी, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनोद नढे यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group