पिंपरी (Pclive7.com):- चैनीसाठी आणि मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातील तब्बल १० वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण ९ दुचाकी, एक लॅपटॉप आणि मोबाईल फोन असा सुमारे ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आदित्य संतोषकुमार पटेल आणि ओम किशोर चिस्तळकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी बोडकेवाडी फाट्याजवळ एक तरुण विनानंबर प्लेटच्या दुचाकीसह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला.

तपासादरम्यान आरोपींनी केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात उघड झाले की, आरोपींवर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ गुन्हे, वाकडमध्ये १ आणि चिंचवडमध्ये १ असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, ऋषिकेश घाडगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.




















Join Our Whatsapp Group