पिंपरी (Pclive7.com):- जुलै महिना सुरू होऊनही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला आहे. हे पाणी १२ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकेच आहे. शहरात गेल्या अडीच वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, त्यात आणखी कपात करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पुढील सात दिवस पावसाची प्रतिक्षा केली जाणार आहे.

जुलै महिना उजाडला तरी, मावळातील पवना धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. धरणाची पाणी पातळी १७ टक्क्यांवर आली आहे. पाऊस पडत नसल्याने धरणाचा पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील पाणी पातळी व पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. आवश्यक त्या ठिकाणीच प्राधान्याने पाणीपुरवठा केला जावा, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिकेस केली आहे. त्यानुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्यासमवेत बैठक झाली.
पुढील सात दिवस पावसाची स्थिती लक्षात घेऊन कपातीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. आठवड्याभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरातील पाणीपुरवठ्याच्या झोननुसार वेळेत कपात केली जाणार आहे. दोन तास पाणी येत असेल तर, ते एक ते दीड तास पाणी दिले जाईल. तीन तास पाणी येत असल्याचे दोन तास पुरवठा केला जाईल. एक तास पाणी असले तर, ते ४५ मिनिटे केले जाईल. तसे पाणीपुरवठा विभागाने झोननिहाय नियोजन केले आहे.
पवना धरणातील साठा न वाढल्यास पाणीपुरवठ्याची वेळ कमी केली जाईल. तसे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पाणी पिण्यासाठी दिले जाईल. इतर ठिकाणी पाणी वापराबाबत कडक निर्बंध केले जातील, असे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात पाण्यासाठी आंदोलने..
पिंपळे निलख परिसरातील पाणी समस्येबाबत माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी मंगळवारी (दि.२८) पालिकेवर मोर्चा आणला होता. तसेच, मनसेने प्रशासनाचा निषेध करीत दररोज पाणी देण्याची आग्रही मागणी करीत गुरूवारी (दि.३०) पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाण्यासाठी उग्र आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांनी उपोषण आंदोलन केले होते.
अडीच वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा
संपूर्ण शहराला एकाच वेळी पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची क्षमता नसल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा करीत शहरवासीयांवर पाणी कपात लादली आहे. अद्याप दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यास तब्बल अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. कपात सुरू असतानाही दोन दिवसांचे पाणी एकावेळी देत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभाग करीत आहे. तर, उन्हाळ्यातील मार्च महिन्यापासून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. अनेक भागात कमी प्रमाणात व दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शॅट डाऊन घेतल्यानंतर तसेच, पाणीपुरवठा वाहिन्या व इतर दुरूस्तीकाम केल्यानंतर पुढील आठवड्याभर शहरातील अनेक भागात पाण्याबाबत ओरड सुरू होते.





















Join Our Whatsapp Group