पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडीतील १८ मीटरचा रस्ताच गायब झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली होती. त्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी अपना वतन संघटना व शिवसेना प्रणित शिवव्यापारी संघटना यांच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत महापालिकला प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई करू असे पत्राद्वारे कळविले आहे.
पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आलेलल्या लाक्षणिक उपोषणाला अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीकीभाई शेख, मानव कांबळे, आण्णाभाऊ साठे जयंतीमोहत्सव समितीचे उपाध्यक्ष मोहन वाघमारे, आभिजीत वाळके, नकुल भोईर, डिसोजा, राजश्री शिरवळकर आदी महिला उपस्थित होत्या.
काळेवाडी येथील १८ मीटर रस्ता गायब झाल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत होते. प्रत्यक्षात १८ मीटरचा रस्ता नसतानाही संपूर्ण रस्त्याची बिले संबंधित ठेकेदारांना देण्यात आली. यामुळे शासन व जनता दोघांचीही डोळेझाक करण्यात आल्याचा आरोप ठेवत अपना वतन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी सक्रीय जाहीर पाठींबा दिला होता.
या आंदोलनाची दखल घेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आंदोलनकर्त्यांना, काळेवाडी १८ मीटर रस्ता प्रकरणातील दोषींवर महापालिका कारवाई करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.