पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीमुळे सत्ताधारी भाजपाची जनमानसातील ‘प्रतिमा’ डागाळत आहे. महापालिकेच्या भांडार विभागाच्या दहा वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्यात यावी;. या विभागातर्फे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया, खरेदी आणि प्रत्येक आर्थिक व्यवहाराचीही सखोल चौकशी करून यातील दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाचा कारभार भ्रष्ट असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आरोग्य विभागासाठी बिन्स कंटेनर खरेदीची निविदा प्रक्रिया भांडार विभागातर्फे राबविण्यात आली. या निविदा प्रक्रियेत सावळा गोंधळ करून भांडार विभागातर्फे मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. यावरून या विभागातील अधिकाऱ्यांची भ्रष्ट कार्यशैली उजेडात आली आहे. त्यामुळे भांडार विभागाच्या १ एप्रिल २००७ ते ३१ ऑक्टोबर २०१७ या दहा वर्षांतील कामकाजाची कसून सखोल चौकशी करण्यात यावी. भांडार विभागातर्फे या दहा वर्षांत प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदा आणि त्यानुसार पूर्ण झालेली कामे किंवा खरेदी आणि अन्य सर्वप्रकारच्या आर्थिक व्यवहारांचीही यात चौकशी करण्यात यावी. यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि निविदाकार, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभाराचा भाजपाचा अजेंडा आहे. त्यानुसार ‘पालिका ते पार्लमेंट’ भाजपाची सत्ता आहे. विकासाला चालना देण्यासाठी भाजपा पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रशासनातील बहुतांश अधिकाऱ्यांकडूनही यासाठी उत्तम सहकार्य मिळत आहे; मात्र काही अधिकारी भाजपाच्या भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभाराला बाधा निर्माण करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील कार्यशैलीनुसार अद्यापही अनेक अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनात असे अनेक अधिकारी आहेत. त्यांच्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळत आहे. यातून शहरवासीयांची मोठी आर्थिक लूट होत आहे. भ्रष्ट अधिकारी याबाबत सत्ताधारी भाजपाला अंधारात ठेवून सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करून भ्रष्टाचार करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील काही ठेकेदारांशी अशा अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. यातून भ्रष्टाचाला खतपाणी घालण्यात येत आहे. याचा थेट परिणाम विकासकामांवर होत आहे. दर्जेदार विकासकामे होत नूसन अनावश्यक उधळपट्टी सुरू आहे. याला आळा घालणे आवश्यक आहे.
महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीमुळे सत्ताधारी भाजपाची जनमानसातील प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे भांडार विभागाच्या दहा वर्षांतील कामकाजाची चौकशी करून दोषी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून आणि निविदाकार, ठेकेदार आदींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी अमोल थोरात यांनी या निवेदनातून केली आहे.