जालना (Pclive7.com):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सोडले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर तब्बल १७ व्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
मात्र, आश्वासन दिले असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यात यश आले असले, तर आंदोलनाबाबत त्यांना काळजी घ्यावीच लागणार आहे.
मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचं आहे.