पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील विजेच्या विविध तक्रारींबाबत तसेच वीजवितरण विभागात असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार जगताप यांनी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना विजेसंदर्भात येणाऱ्या अडचणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. शहराच्या अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याकडे त्यांनी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे इन्फ्रा १ व २ (पायाभूत सुविधा) ची उभारणी व कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली.
शहरातील नादुरूस्त असलेले वीजमीटर तक्रारीनंतर तातडीने बदलले जात नसल्याचेही आमदार जगताप यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील सहा सबस्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी आमदार जगताप यांनी केली. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आमदार जगताप यांनी मांडलेल्या सर्व समस्यांचे येत्या १५ जानेवारीपर्यंत निराकरण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला महावितरणचे मुख्य व्यवस्थापन संचालक संजीवकुमार, अधीक्षक अभियंता दिवाकरन, कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, वीजवितरण समितीचे सदस्य रामकृष्ण राणे, गोरक्ष अंबरुळे आदी उपस्थित होते. दरम्यान, ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीबाबत पूर्वकल्पना देऊनही पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दूरध्वनीवरून शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच प्रशासकीय शिस्त पाळण्याची सक्त ताकीद दिली.
























Join Our Whatsapp Group