लोणावळा (Pclive7.com):- सेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुण पवना धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी बाराच्या सुमारास ठाकुरसाई येथे कॅम्प साईट येथे घडली. दोघांपैकी एका तरुणाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे तरुण पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होते. ते दोघे आणि इतर सात असे नऊ तरुण फिरण्यासाठी पवना धरणावर आले होते. मोहीत अनिल जाधव (वय २८) सुवर्ण मंदिर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, वेदप्रकाश चंदलाल राणा (वय २८) नागपूर अशी मयत तरूणांची नावे आहेत. पवना धरणाच्या परिसरात हा ग्रुप फिरण्यास आला होता. रात्री त्याठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज सकाळी दोघेजण धरणाच्या पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी गेले. त्यातील एक जण सेल्फी काढत असताना पाण्यात पडला. तो बुडत असल्याचे पाहून त्याच्या सोबतच्या मित्राने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आयएनएस शिवाजी टीमच्या पथकाने शोध घेऊन दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दुसऱ्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.






















Join Our Whatsapp Group