पिंपरी (Pclive7.com):- आज मोठ्या प्रमाणात नद्यांवर अतिक्रमणे केली जात आहेत. खरे तर नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. जिवंत नद्या या जिवंत जगाचे द्योतक आहेत. त्यामुळे नद्यांचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नदी वाचली तर समाज संस्कृती वाचेल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिंचवड येथे आज व्यक्त केले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून चिंचवडगाव येथे आज (रविवारी) नदी संवर्धन व स्वच्छता याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हर्डीकर बोलत होते.
यावेळी कर्नल सुरेश पाटील, रानजाई प्रकल्पाचे आबा मसुगडे, शैलजा देशपांडे, अश्विन परांजपे, शरद मांडे आदी उपस्थित होते.
सकाळी साडेआठ ते साडेदहा दरम्यान मोरया गोसावी मंदिराजवळील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये नदीविषयक रांगोळी प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, प्रख्यात चित्रकारांचे लाईव्ह पेंटिंग, नदीकाठी सुरेल बासरीवादन, तसेच पवना नदीविषयी यशोगाथा सादर करण्यात आली.
महोत्सवाची सुरुवात राजू यांच्या सुरेल बासरी वादनाने झाली. त्यानंतर प्रख्यात चित्रकारांनी जलरंगाच्या माध्यमातून सुंदर चित्रे साकारली. नदीविषयक छायाचित्र प्रदर्शनात हौशी छायाचित्रकारांबरोबरच पिंपरी चिंचवड परिसरातील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रेही मांडण्यात आली होती. यावेळी तीन लघुपट दाखविण्यात आले. यामध्ये उगम ते संगम जलदिंडीच्या दरम्यान केलेले चित्रण, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी राबविलेला जलपर्णीमुक्त पवना उपक्रम आणि ग्रीन थम्ब या पुण्याच्या संस्थेने खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या उपक्रमाची माहिती या चित्रफितीद्वारे देण्यात आली. त्यानंतर नदीविषयी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींनी मनोगत व्यक्त करताना नदी स्वच्छता आणि संवर्धन याविषयीचे महत्व विशद केले.
पवना नदीविषयी यशोगाथा सादर करताना पिंपरी चिंचवड सिटिझन्स फोरमचे तुषार शिंदे यांनी गोडुंबरें येथे पवना नदी स्वच्छता आणि संवर्धनविषयक राबविण्यात आलेल्या पायलट प्रोजेक्टबद्दल माहिती दिली.
यावेळी बोलताना कर्नल सुरेश पाटील म्हणाले, “पर्यावरणाचा लढा हा मानवी न्यायाचा, समाजहिताचा आणि शाश्वत विकासाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर व्यापक विचार सुरू असून या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी समूहभान निर्माण करण्याची जबाबदारी पेलावी” असे त्यांनी आवाहन केले.
रानजाई प्रकल्पाचे आबा मसुगडे म्हणाले, “आपल्या संस्कृतीत नदीला जीवनदायिनी मातेचे स्थान दिलेले आहे. नदीकाठी अनेक संस्कृती रुजल्या व विकसित झाल्या. परंतु आजच्या आधुनिक काळात एकीकडे भौतिक विकास साधत असताना नद्या मात्र लुप्त होत आहेत. अनेक नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मात्र जागरूक नागरिक आणि शासनाच्या प्रयत्नातून नदीला पुनर्जन्म मिळाल्याची उदाहरणे देखील आहेत. हे आशेचे किरण नदीचे उद्याचे भविष्य उज्ज्वल असल्याची ग्वाही देतात” यावेळी जेएसपीएम या कॉलेजच्या शाश्वत ग्रुपने पर्यावरणाबाबत केलेली जनजागृती व ‘नदी वाचवा’ बद्दल केलेल्या कार्याची माहिती दिली. या उपक्रमात सीमेदू या मीडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीपाद इंगळे यांनी पटकावला तर द्वितीय अंजली धसके व तृतीय क्रमांक महेंद्र मेटकरे यांनी मिळवला. रांगोळी प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून नितीन ठाकरे, विष्णु पूर्णये, स्वाती देशपांडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन धनंजय शेडबाळे यांनी केले तर आभार अॅड. सोमनाथ हरपुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मधुरा कुलकर्णी, ओंकार गिरीधर, सचिन काळभोर यांनी विशेष परिश्रम घेतले.





















Join Our Whatsapp Group